याडीकार
¤ याडीचे महात्म्य समजून घेताना ¤
=======================
" याडी " या आत्मकथनाचे समीक्षण,
लेखक : याडीकार पंजाब चव्हाण, पुसद.
**************************************
✍️(c.) : डाॅ.वसंत भा.राठोड, मांडवी किनवट.
मो. नं. : 9420315409, 8411919665.
**************************************
आईच्या महात्म्याचे गुणगान समाजातील अनेक लेखक, कवि, विद्वान, प्रज्ञावान अशा प्रतिभासंपन्न साहित्यिकांनी आपापल्या परीने केले आहे. आईची थोरवी गातांना दुधावरची साय, लेकराची माय म्हटलेले आहे. "हंबरून वासराले चाटती जेंव्हा गाय, तेंव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. "अशी अफलातून महिमा आईची गायीलेली आहे. मुलगा आई पुढे कितीही मोठा असला तरी तिच्या वात्सल्यापुढे लहानच असतो. एका कविने फार सुंदररित्या आपल्या कवितेतून अधोरेखित केले आहे. " आई तुझ्यापुढे मी आहे आजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा. " एका शायराने तर आपल्या शब्द सामर्थ्याच्या बळावर आईचे महात्म्य अतिशय उंच शिखरावर नेऊन पोहोचविले आहे.
" शर्यत लगी विद्वानोंकी,
एक शब्द मे विश्व का सार लिखनेकी ,
शिर्फ, मैने " माॅ "का नाम लिखा,
बस, मैने " माॅ "का नाम लिखा. "
असाच एक ध्येयवेडा आईचा तान्हा याडीकार पंजाब चव्हाण " याडी " या आपल्या आत्मकथनामध्ये मातेच्या ममत्वातून अठरा जन्माची दलिंदरी कशी कात टाकीत , महाकाय गरीबीचे पलीते उधळत वाट काढीत पुढे सरकते व आपल्या तान्हूल्या पंजाला साहेब बनविते. हे याडी या आत्मकथनातून अतिशय वात्सल्यपूर्ण वर्णन याडीकार पंजाब चव्हाण यांनी केले आहे.
माझी याडी कोंबडा बाग दिला की अंधाऱ्या रात्रीतच घर गृहस्थीच्या कामाला लागायची , सकाळच्या झुंजू मुंजू पासून ते सांजच्या काळोख अंधारा पर्यंत केवळ नी फक्त श्रमाचीच पूजा करीत राहायची. हाता, पायात त्राण असे पर्यंत छातीफोड कष्टाचीच भक्ती ती करीत राहायची. आई वडील नाना प्रकारचे कष्ट नी मेहनत करून आम्हा चिमुकल्या भांवडाची पाठीला चिपकलेली पोट कोथळी भरीत राहायचे.
आपल्या याडीच्या जन्मोंजन्मीच्या रूणातून कणभर (राई किंवा मोहरी येवढे)उत्तरायी व्हावे या हेतूने लेखक पंजाब चव्हाण यांनी आपले याडी हे आत्मचरित्र 11 जानेवारी 2003 साली उमरखेड , जि.यवतमाळ येथे अखिल भारतीय पहिले गोरबंजारा परिवर्तनवादी साहित्य संमेलनात अध्यक्ष भीमणीपुत्र मोहन नाईक यांच्या हस्ते प्रकाशन केले. आज या आत्मकथनाच्या हजारो प्रती विकल्या गेल्या. तसेच या आत्मकथनाची दुसरी आवृत्ती मागच्या वर्षी 17 नोव्हेंबर 2019 ला प्रकाशित झाली. लेखकाच्या खडतर जीवनाचा प्रवास, जडण घडणीचे वेग वेगळे टप्पे वाचकांच्या काळजाचा ठाव घेणारे आहेत.
याडी सुंदलचा लहानसा चुणचुणीत मुलगा स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात शाळेतून पहिला येतो. त्यावेळेस सर्व शिक्षक या बाळाची पाठ थोपटून शाब्बासकी देतात. आपल्या नातवाचे भाषण ऐकून आजोबाला गगन हातभर ठेंगणा दिसायला लागतो. त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो नी त्याच आनंदाच्या भरात आपली सूनबाई सुंदलला येऊन सांगतो, " सुदल तुझा पोरगा फार हुशार आहे, एक दिवस फार मोठा अधिकारी होईल " तेंव्हापासून या बालकांने कधी मागे वळून पाहिले नाही. शिक्षण क्षेत्रात उत्तरोत्तर प्रगती करीत राहिला. गरीबीच लेण पांघरुन प्रसंगी उपाशी तपाशी राहून शिक्षणाचा मूलमंत्र जपत राहिला. जेवणाच्या एका पंगतीतले सुंदर वर्णन लेखकाने केले आहे. भयंकर भूक लागलेली असतांना बालवय बुंदीच्या जेवणाकडे लालचावले. " वाढपीने, बुंदी तर सोडाच साधा पोटभर भात सुध्दा वाढला नाही. मला अजूनही त्या माळकरी वाढपीचे आश्चर्य वाटते. पोट भरलेल्या माणसांना तो आग्रह करून वाढायचा. आम्हा उपाशी लेकरांना त्याने का वाढलं नसावं ? रंजल्या गांजल्याची सेवा करावी हे त्याला माहीत नसेल का ? " असा आर्त टाहो फोडत इथल्या मरणासन्न व्यवस्थेला लेखक प्रश्न विचारतो. पान नंबर 18 आणि 19 वर सुंदररित्या वर्णन त्यांनी केले आहे.
लेखकाचे वडील लालसिंग आणि चुलता भिकाजी हे पुसदला सुधाकरराव नाईक यांच्या बंगल्यात अहोरात्र काम करायचे. आठ आठ दिवस गावी यायचे नाहीत. काका भिकाजीच्या मनात काय हुक्की उठली कोण जाणे, त्याने चांगल्या प्रकारे चाललेल्या परिवारातून वेगळी चूल मांडली. त्या प्रसंगीचे मन हेलावून टाकणारे वर्णन लेखकाने अधोरेखित केले आहे. " बाबा हंबरडा फोडत काकाला म्हणाला, भिका घरातील सर्व वस्तू घेऊन जा परंतु आई वडील मला दे " (पान नंबर 22 वर) केलेले वर्णन.
लेखकांचे प्राथमिक शिक्षण अतिशय हालाकीच्या परिस्थितीत पार पडले. काळाशी दोन हात करून झुंज देत बाळ पंजाब पुस्तकांची पाने न्याहाळू लागला. वाचन लेखनाचा पाया मजबूत करू लागला. पुढे त्याच बळावर माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी पुष्पावती नगर म्हणजे पुसदला आला. तेथे कोषटवार विद्यालयात माध्यमिकचे शिक्षण पूर्ण करून मॅट्रिक पासची गुणपत्रिका आपल्या याडीला दाखवितो. तेव्हांचे याडीचे फूललेले हाष्य तिच्या मुखमंडलावर तेजाळलेल्या पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे दिसत होते. कारण याडीने उपसलेले काबाडकष्ट आणि हालअपेष्टा ती आपला बाळ पंजाबच्या मॅट्रिक पासच्या गुणपत्रिकेत पाहत होती.
पंजाबराव मॅट्रिक पास होऊन पुढे फूलसिंग नाईक महाविद्यालयात अकरावीत प्रवेश घेऊन काॅलेज कुमार होतात. अनवाणी पायानी, फाटक्या टुटक्या कपड्यांनी, डोक्यावर वाढलेले केसं घेऊन बारावी उत्तीर्ण होतात. हा काॅलेजकुमार शिक्षण घेतच अनेक प्रकारची कामे करतो. तरीही गरीबी काही पिच्छा सोडत नव्हती. भरल्या तारूण्यावर नियंत्रण ठेवून मामाची मुलगी सितेवरील प्रेम आजच्या नवोदित तरूण पिढीला फार काही शिकवून जातो.
पंजाबराव ,आपल्या पाचवीलाच पुजलेल्या गरीबीशी लढा देत बारावी पास झाल्यानंतर कृषी पदविका करून घेतात. पुढे बेकारीचे दिवसं काढत मोल मजुरीचे, मुकादमाचे काम करतात. आपल्या प्रखर मेहनतीने व जिद्दीने ग्रामसेवक म्हणून नोकरीला लागतात. आपल्या प्रांजळ कार्याच्या कर्तबगारीवर एका झोनलचे विस्तार अधिकारी होतात.
एक वेळेस बुंदी करीता घोट घोट तरसणारा हा बालक आपल्या स्वकष्टाने बुंदीचा लाडू मिळवितो त्याचे सेवन करतांना नेत्रातून आसवे ढाळतो. अशा अनेक प्रसंगावर लेखक हळवा होतो. कुठे कुठे समाजातील आडंबर, अंधश्रद्धा, खूळ्या समजूतीवर जबरदस्त प्रहार करतो. तांडावासी शुल्लक कारणावरही का भांडणं करतात ? त्या ऐवजी आपल्या कष्टाची चिज का करीत नाहीत ? या विषयी उद्विग्न मनाने चिडही प्रकट करतो.
समाज सुधरावा, गतीमान, नितीमान व्हावा या करीता लेखक समाज सेवेचा वसा घेऊन गावोगावी, खेडोपाडी फिरतो. समाजातील तरूणांनी शिक्षणाची कास धरून परिवर्तनाच्या लाटेत सहभागी व्हावे असा प्रयत्न करतांना ते दिसतात आणि आपल्या आजोबा, वडील, याडीचे शब्द संस्कार सार्थकी लावतात.
लेखक याडीकार पंजाबराव चव्हाण म्हणून केवळ विदर्भ, मराठवाड्यात प्रसिद्ध नसून संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची ख्याती आहे. त्यांचे याडी हे आत्मचरित्रपर ग्रंथ अतिशय वाचनीय आहे. त्याचे मुल्य 120 रू आहे.
याडी,
बंजारा हस्तकलेची शोकांतिका,
शिकारी राजा सुधाकरराव नाईक,
समीक्षा ग्रंथ,
इत्यादी प्रकारची त्यांची महाराष्ट्रात गाजलेली पुस्तके आहेत. ही पुस्तके अतिशय रूपक नी आकर्षक आहेत. संदर्भा करीता बहुमूल्य असून सदैव ठेवणीत साठवून ठेवाव्या अशा आहेत.
आदरणीय लेखक याडीकार पंजाबराव चव्हाण यांना दिर्घ आयुरारोग्य लाभो या सदिच्छेसह थांबतो.
धन्यवाद 🌹👏!
**************************************
समीक्षक/ शब्दांकन : डाॅ.वसंत भा.राठोड ,मांडवी किनवट.
मो.नं. : 9420315409, 8411919665.
Mail ID:rathodvasant863@gmail.com
**************************************
Comments
Post a Comment